Skip to main content

रविवारच Subscription

    आज घरात निवांत असताना, अंगणात पडलेल्या धुळीला बघून माझ्या मनात विचार आला की कसं खेळलो ना आपण, ह्या मातीत, ह्या धुळीत. घातलेले कपडे आणि कपड्याच्या आतसुद्धा सगळं धुळीत माखायचं, पण खेळायची धुंदी कमी व्हायची नाही. विष अमृत, डोंगर का पाणी, विटी दांडू आणि कधी कधी क्रिकेट खेळायला कोणता व्हाट्सअॅप ग्रुप लागायचा नाही; नुसती हाक मारली की सगळी हजर. उन्ह वर चढायला लागली की कोणाच्यातरी घरात जायचं, कॅरमवर पावडर फासायची आणि अगदी हाताला कड येईपर्यंत कॅरम बोर्डवर नेम धरायचा. ज्याला क्वीन निघते त्याला कवर कधीच निघत नाही, असं म्हणायचं आणि ओम भगबुगे वगैरे मंत्र टाकायचे, समोरच्याला नेम चुकायला भाग पाडायचं. कॅरमचा डाव अगदीच जास्त खेचला गेला आणि बसून बसून पाय ओ म्हणायला लागले की बाहेर बघायचं आणि परत अंगणात दंगा करायला घुसायचं. तो चालायचा अगदी अंधार पडेपर्यंत, आणि कधीकधी अंधार पडल्यानंतरही. मग तीन-चार घरातल्या आया बाया आपली कार्टी त्या धुरकटलेल्या अंधारातून अचूक शोधून काढायच्या आणि पाठीत रपारप फटके देऊन घराकडे ओढत न्यायच्या.


"अभ्यास करत जा की रे कधीतरी, परीक्षेत काय अंगावरची धूळ झटकून येणार काय?" असं म्हणत मारून-मुटकून सोमवारी शाळेत मागितलेल्या अभ्यासासाठी बसवायचं, असा रविवारचा दिनक्रम चालूच असायचा.


खरं तर ही रविवारची संस्कृती होती; तेव्हा मुलांना दिवसभर सांभाळायची चिंता नव्हती. गल्लीतली मोठी पोर, मोठ्या भावासारखी बारक्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन हिंडायची. मोठ्यांचा आबादुबी, लपाछपीचा डाव चालू झाला की लहान मूल आपडी थापडी गुळाची पापडी खेळायची. कधी कधी क्रिकेटमध्ये एखादा गडी कमी पडला की लहानांना मोठ्यांचा खेळात लिंबू टिंबू बनायची संधी मिळायची. असं करत दिवस जायचा. आमचा बारक्या, सोन्या वगैरे जेवत नाहीत अशी काळजी आईबापाला नसायची. दिवसभर हिंडून पोरगं आपोआप भरपेट जेवायचं आणि पडल्या पडल्या ताणून द्यायचं.


मुलांच्या हातात कॅरमच्या स्ट्रायकरऐवजी मोबाईल नावाचा एक राक्षस आलाय आणि त्यानं अंगण नावाची ही रविवारची संस्कृती संपवली आहे. आज मुलांना लपाछपी खेळूया का विचारलं तर कदाचित ती आपल्यालाच विचारतील की Play Store वर आहे का म्हणून. आपण गल्लीतल्या एकाच्या घरी असलेल्या CD प्लेयरवर भाड्याने पिक्चरची CD आणून बघायचो, आताच्या मुलांना OTT सब्सक्रिप्शन मिळतं.


आपल्याला सुद्धा आता रविवारसोबत शनिवारी पण सुट्टी आहे, पण असं खुलं राहायला आणि खेळायला सवंगडी नाहीत. सवंगडी तर सोडाच, पण आता अंगण तस राहीलं नाही.


आयुष्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन होतं, जे आता एक्स्पायर झालंय. म्हणून कायम मनात हाच प्रश्न घोंगवतो की हे प्रीमियम सब्सक्रिप्शन आता रिन्यू होईल का?





Comments

खूप छान 💗
Anonymous said…
मस्तच 👌🏻
Anonymous said…
Mastch

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

महाकुंभ : एका शोधयात्रेची गोष्ट

प्रयागराज – गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र. २०२५ मधील महाकुंभमेळ्यासाठी संपूर्ण शहर प्रकाशात न्हाल्यासारखे वाटत होते. लाखो भक्त, साधू-संत, पर्यटक आणि शोधक आत्मे या महासंगमात सहभागी होण्यासाठी जमले होते. याच गर्दीत एक तरुण प्रवासी होता – आदित्य, जो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी इथे आला होता. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी, आलिशान आयुष्य आणि सोयी-सुविधांनी भरलेले जग असूनही, त्याच्या मनात सतत एक प्रश्न गोंधळ घालत होता – “मी हे सगळं कशासाठी करतोय?” पहाटेचा पहिला किरण गंगेवर पडला तसे महाकुंभातील हालचालींना वेग आला. आदित्य पहिल्यांदाच अशा भव्य सोहळ्याला हजर होता. अखाड्यांचे साधू, नागा साधूंच्या मिरवणुका, मंत्रोच्चारांचा गजर आणि भक्तांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. तो गंगेच्या काठावर पोहोचला आणि डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून थक्क झाला, नागा साधू निर्वस्त्र होऊन ध्यानस्थ होते, काही संत मोठ्या भक्तिभावाने प्रवचन देत होते, काही भक्तगण नदीत स्नान करत होते, तर काही जण केवळ या वातावरणाचा आनंद घेत होते. “हे सगळं मी फक्त टीव्हीवरच पाहि...

Social Media